Wednesday, February 4, 2026

संघर्षातून सेवेकडे : श्री. आनंद वाढे यांचा अमृतमयी जीवनप्रवास

संघर्षातून सेवेकडे : श्री. आनंद वाढे यांचा अमृतमयी जीवनप्रवास

भारतीय समाजरचनेत शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले जाते. हेच प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. आनंद वाढे. सामान्य कुटुंबातील प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेऊन, कष्ट, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि शिक्षणावरील अढळ श्रद्धेच्या बळावर त्यांनी प्राथमिक शिक्षक ते शिक्षणाधिकारी (माध्यमिक) असा प्रेरणादायी प्रवास केला. ही वाटचाल नव्या पिढीसाठी दीपस्तंभासारखी आहे. “शिक्षण हीच खरी संपत्ती” या विचाराचा जीवनभर पुरस्कार करणारे, सामान्य कुटुंबातून उभे राहून शिक्षण क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. आनंद वाढे. त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव वर्ष साजरे होत असताना, त्यांचा जीवनप्रवास हा केवळ वैयक्तिक यशाची कथा नसून समाजाला दिशा देणारी प्रेरणादायी गाथा आहे.
संघर्षातून घडलेले बालपण
श्री. आनंद वाढे यांचा जन्म एका अत्यंत सामान्य कुटुंबात दि. 06 फेब्रुवारी 1951 रोजी घोटी येथे झाला. जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच संघर्ष, कष्ट आणि जबाबदारी यांची ओळख झाली. घोटी या जन्म गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले, घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना प्राथमिक शिक्षण घेणे ही अवघड होते अशा खडतर परिस्थितीमध्ये दोन वर्षे शिक्षणामध्ये खंड घेऊन पुढे कोसमापोलीटन विद्यालय किनवट माध्यमिक शिक्षण, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चिखली आणि जिल्हा परिषद हायस्कूल किनवट आशा विविध ठिकाणी आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करावे लागले. प्रतिकूल परिस्थिती, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडचणी असूनही त्यांनी शिक्षणाची कास घट्ट धरली. कठोर परिश्रम, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर त्यांनी आपला मार्ग स्वतः घडविला. 1974 मध्ये लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे B.Sc. गणित ह्या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. 
प्राथमिक शिक्षक म्हणून सेवाव्रताची सुरुवात
आपल्या जीवनप्रवासाची सुरुवात जून 1974 ला अनुसयाबाई ज. एकनाथ पाटील विद्यालय पोहंडूळ ता. आर्णि येथे त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून केली. शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून जीवन घडवणारे शिल्पकार असतात, हा विचार 1978-79 मध्ये शासकीय अध्यापक विद्यालय परभणी येथे बी.एड चे शिक्षण पूर्ण करून सिद्ध केला. बी.एड चे शिक्षण पूर्ण करून परत अनुसयाबाई ज. एकनाथ पाटील विद्यालय पोहंडूळ ता. आर्णि येथे शिक्षक म्हणून नियमित पणे रुजू झाले. शिक्षक म्हणून त्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. शाळा म्हणजे ज्ञानासोबतच संस्कारांची शिदोरी देणारे मंदिर आहे, हा विचार त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. गरीब, मागास व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो हा विचार त्यांना स्वस्त बसू देत नव्हता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच ठेवली आणि 1983 मध्ये महाराष्ट्र लोक सेवा आयोग कडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत शिक्षण सेवा अधिकारी वर्ग 2 करिता त्यांची निवड झाली. 
प्रशासनात जबाबदारी आणि दूरदृष्टी
त्यांची गटशिक्षणाधिकारी म्हणून पदस्थापना झाले झाली आणि 1997 पर्यंत येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्य केले आणि 1997 ते 1998 या कालावधीत जि. प. नांदेड येथे प्रौढ शिक्षणाधिकारी म्हणून कार्य केले, पुढे ऑगस्ट 1998 ते फेब्रुवारी 2001 या कालावधीत जि.प.नांदेड येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून त्यांना बढती देण्यात आली, जुलै 2013 ते ऑक्टोबर 2006 या कालावधीत जि. प. नांदेड वाशिम येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून त्यांचे बदली झाली तर वाशीम वाशीम येथे झाली या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांच्या हितासाठी धोरणात्मक निर्णय, शाळांच्या शैक्षणिक दर्जात सुधारणा, प्रशासनात पारदर्शकता व शिस्त यांवर विशेष भर दिला. 2006-2007 मध्ये जिल्हा परिषद गडचिरोली येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणूनही अति दुर्गम, आर्थिक दृष्ट्या मागास भागात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी भरीव कार्य केले आणि शेवटी 2007 ते 2009 ही दोन वर्ष जि. प. नांदेड येथे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) म्हणून कार्य करून 28 फेब्रुवारी 2009 ला आपल्या सेवेतून निवृत्त झाले. आपल्या निष्ठावंत सेवेच्या, प्रामाणिक कर्तव्यपालनाच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी शिक्षण विभागातील विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पेलल्या. या पदावर कार्यरत असताना त्यांनी शिक्षकांच्या व्यावसायिक विकासाला प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी ठोस निर्णय, शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी नियोजन, प्रशासनात शिस्त व पारदर्शकता यावर विशेष भर दिला.
साधेपणा, माणुसकी आणि समाजभान
उच्च पदावर असूनही त्यांचा स्वभाव सदैव साधा, नम्र आणि माणुसकीने ओतप्रोत राहिला. शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील सर्व घटकांशी त्यांनी आपुलकीचे नाते जपले. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, शिक्षकांना प्रेरणा देणे आणि शिक्षणाला सामाजिक परिवर्तनाचे साधन बनवणे हेच त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य ठरले.
अमृत महोत्सव वर्ष – प्रेरणेचा सोहळा
आज त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव वर्ष साजरे होत असताना, त्यांचे संपूर्ण जीवन हे संघर्षातून यशाकडे जाण्याची जिवंत गाथा आहे. श्री. आनंद वाढे यांचा जीवनप्रवास सांगतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण, कष्ट आणि प्रामाणिकपणा यांच्या बळावर यशाची शिखरे गाठता येतात. त्यांचे संपूर्ण आयुष्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
कृतज्ञतापूर्वक अभिवादन
श्री. आनंद वाढे हे केवळ एक यशस्वी शिक्षणाधिकारी नव्हते, तर ते एक आदर्श शिक्षक, संवेदनशील प्रशासक आणि समाजाचे मार्गदर्शक होते. त्यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाधान लाभो, हीच मनःपूर्वक सदिच्छा. त्यांचे कार्य आणि विचार पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहोत, हीच अपेक्षा.

प्रा. डॉ. टी. एम. गुरनुले,
संशोधन मार्गदर्शक व सहयोगी प्राध्यापक
श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
श्रीक्षेत्र माहुर, जि. नांदेड.

Tuesday, February 3, 2026

श्री रेणुकादेवी महाविद्यालयात “केंद्रीय अर्थसंकल्प २०२६” वर चिकित्सक चर्चासत्र संपन्न

श्री रेणुकादेवी महाविद्यालयात “केंद्रीय अर्थसंकल्प २०२६” वर चिकित्सक चर्चासत्र संपन्न

श्रीक्षेत्र माहूर ()

     येथील बळीराम पाटील मिशन, मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने “चिकित्सा : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६” या विषयावर दि. २ फेब्रुवारी २०२६ रोजी विश्लेषणात्मक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

     या चर्चासत्रात डॉ. तुळशीदास गुरनुले यांनी अर्थसंकल्पाचे विविध प्रकार स्पष्ट करून यंदाचा अर्थसंकल्प तुटीची भरपाई करण्यावर भर देणारा असल्याचे नमूद केले. डॉ. संदीप जाधव यांनी अर्थसंकल्पीय परंपरेविषयी मार्गदर्शन केले. प्रा. अनिल दोंदे यांनी स्वस्त व महाग झालेल्या वस्तूंचे सविस्तर विवेचन केले. तज्ज्ञ अभ्यासकांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मधील आर्थिक तरतुदी, विकासाभिमुख योजना, शिक्षण, आरोग्य, कृषी व सामाजिक क्षेत्रांवरील परिणामांचा सखोल आढावा घेत अर्थसंकल्पाची चिकित्सक मांडणी केली.

     सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड व सचिव सौ. संध्याताई राठोड यांच्या प्रेरणेने तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्रातून विद्यार्थ्यांना अर्थसंकल्प समजून घेण्याची व चिकित्सक दृष्टिकोन विकसित करण्याची संधी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम आत्राम यांनी केले, तर कनिष्ठ विभागाचे प्रा. संजय चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तातडीने चर्चासत्राचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे बहुधा राज्यातील हे पहिलेच महाविद्यालय असावे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

संघर्षातून सेवेकडे : श्री. आनंद वाढे यांचा अमृतमयी जीवनप्रवास

संघर्षातून सेवेकडे : श्री. आनंद वाढे यांचा अमृतमयी जीवनप्रवास भारतीय समाजरचनेत शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले जाते. हेच प्रत्यक्षा...